बायको सासरी येत नसल्याचा राग, संतप्त जावयाने सासऱ्याच्या छातीत चाकू भोसकल, घटनेने खळबळ..

छत्रपती संभाजीनगर : केवळ पत्नी सासरी परत येत नसल्याच्या रागातून संतप्त झालेल्या जावयाने समजूत काढायला आलेल्या सास-याच्या छातीत चाकूने वार करत त्यांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकी आली आहे. ही थरकाप उडवणारी घटना मंगळवारी (ता.१५) रात्री : ११ वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर औरंगपूर गावात घडली आहे.
मृत व्यक्तीचे नाव सुभाष रूपचंद भगुरे (वय ४७, रा. औरंगपूर) असून, आरोपीचे नाव मनोज गुलाब गटोरसिंग (वय २८, रा. रेलगाव, ता. सिल्लोड) आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, चार वर्षांपूर्वी सुभाष भगुरे यांच्या मुलीचा विवाह मनोज गटोरसिंग याच्याशी झाला होता. सुरुवातीला संसार सुरळीत चालला, पण गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये मतभेद वाढले. जयश्री भगुरे, ही काही काळापासून माहेरीच राहात होती आणि सासरी परतण्यास नकार देत होती.
दरम्यान, यामुळे मनोज संतप्त आणि अस्वस्थ होता. जयश्रीच्या सास-यांनी सुभाष भगुरे यांनी जावयाला समजावण्यासाठी माणुसकीच्या नात्याने पुढाकार घेतला. मात्र, रागाच्या भरात अंध झालेल्या मनोजने सास-याशी वाद घालून त्यांच्यावर थेट चाकूहल्ला केला. छातीत झालेल्या गंभीर वारामुळे सुभाष भगुरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी मनोज गटोरसिंग घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.