Anantnag Encounter : चकमकीत शहीद झालेल्या जवानांची संख्या चारवर, काश्मीरमध्ये ऑपरेशन सुरूच..
Anantnag Encounter श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील गांडुल जंगलात आणखी दोन मृतदेह सापडले. यातील एक मृतदेह चकमकीच्या पहिल्याच दिवशी बेपत्ता झालेल्या सैनिक प्रदीप यांचा असल्याची माहिती आहे. तर, दुसऱ्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. Anantnag Encounter
तसेच रविवार (ता.१७) दहशतवाद्यांच्या अड्ड्यात सापडलेल्या जळालेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी लष्कर दहशतवादी उझैर अहमदच्या कुटुंबीयांकडून नमुने घेण्याची तयारी पोलीस करत आहेत.
सुरक्षा दलांचा असा विश्वास आहे की हा मृतदेह ए प्लस श्रेणीतील दहशतवादी उझैरचा असू शकतो जो दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर गोळीबार करताना मारला गेला होता.
सोमवारी (ता.१८) सकाळी पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला, जो काही वेळाने शांत झाला. यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहिमेदरम्यान दोन मृतदेह बाहेर काढले.
बुधवारी झालेल्या चकमकीच्या पहिल्या दिवशी लष्कराचे दोन जवान बेपत्ता झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे, त्यापैकी एक प्रदीप होते. त्यामुळे या चकमकीत बळी गेलेल्यांची संख्या आता चार झाली आहे.
त्यापैकी १९ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग अधिकारी होते. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनचक, जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक हुमायून भट आणि लष्करातील शिपाई प्रदीप यांचा समावेश आहे. दोन मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही.
दरम्यान, यातील एक मृतदेह दहशतवादी उझैर अहमदचा असल्याचे समजते. अधिकाऱ्यांनी सांगितले की सुरक्षा दल घनदाट जंगल क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आणि हेलिकॉप्टर वापरत आहेत, ज्यामध्ये अनेक गुहेसारखी लपलेली ठिकाणे आहेत जिथे बुधवारपासून दहशतवादी लपले आहेत.