मणिपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना! दोन महिलांची नग्न धिंड काढत सामूहिक बलात्कार, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
मणिपूर : मणिपूर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जळत आहे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झालेली आहे. माणसे मारली जात आहेत. हे पुरेसे नसताना याहूनही लाजिरवाणी घटना समोर येत आहे. हिंसाचाराच्या घटना सुरूच असताना माणुसकीला काळिमा फासणारा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यानंतर तणाव वाढला आहे.
एका जमावानं दोन महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावरून त्यांना फिरवलं. त्यांचा भर रस्त्यात विनयभंगही करण्यात आला. या दोन महिलांना शेतात नेऊन तिथे त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या पीडित महिला आदिवासी समाजाच्या असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विट करून कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे.
मणिपूरमधील व्हिडिओ भयावह असून, निषेधार्ह आणि अमानवी आहे. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी चर्चा झाली आहे. या घटनेचा तपास केला जात आहे. आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती स्मृती इराणी यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
पोलिसांनी प्रसिद्ध केलं निवेदन
व्हायरल झालेल्या व्हिडिओवर मणिपूर पोलिसांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ४ मे २०२३ रोजी दोन महिलांना निर्वस्त्र फिरवल्याच्या घटनेप्रकरणी नोंगपोक सेकमाई पोलीस ठाण्यात (जिल्हा -थौबल) अज्ञात शस्त्रधारी आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. दोषींना लवकरात लवकर अटक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
राज्यातील परिस्थिती निवळण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन मणिपूर पोलिसांनी केले आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता त्यांची शाहनिशा करण्यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावरून संपर्क साधावा. शस्त्रे, दारूगोळा, स्फोटके पोलिसांकडे सोपवण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.