मोठी बातमी! सातत्याने वादग्रस्त ठरणारे अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांना धक्का, अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय…

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, आता या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

तसेच गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्यं करुन स्वत:च्या पक्षाची कोंडी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे-पाटील यांची प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये सातत्याने तणाव निर्माण होताना दिसत होता. तर रुपाली पाटील ठोंबरे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर तिखट आणि शेलक्या भाषेत टीका केली होती.
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणावरुन रुपाली ठोंबरे यांनी आपल्याच पक्षाच्या रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली होती. त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी अजित पवार यांचीही भेट घेतली होती. ही भेट होऊन काही तास उलटत नाही तोच रुपाली ठोंबरे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान, याशिवाय, वैशाली नागवडे आणि संजय तटकरे यांना देखील प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले आहे. तर मध्यंतरी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे पायउतार व्हावे लागलेल्या सुरज चव्हाण यांची पुन्हा एकदा प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावर अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नव्याने प्रवक्ते नियुक्त, कोणाला संधी?
अनिल पाटील, रुपाली चाकणकर, ब्रिजमोहन श्रीवास्तव, चेतन तुपे आनंद परांजपे, अविनाश आदिक, सना मलिक, राजलक्ष्मी भोसले, सुरज चव्हाण हेमलता पाटील, प्रतिभा शिंदे, विकास पासलकर, राजीव साबळे, प्रशांत पवार, श्याम सनेर, सायली दळवी, शशिकांत तरंगे.