Amit Kanchan : सरपंचपदाच्या बोहल्यावर एकाला चढविलं!! मात्र कारभाऱ्यांनी घोडाच उलटा पळविला, सरपंचपदी अमित (बाबा ) कांचन यांची निवड चांगलीच चर्चेत..!!

जयदिप जाधव
Amit Kanchan : उरुळीकांचन गावच्या सरपंचपदासाठी घोड्यावर एकाला बसवून सरपंचपदाची वरमाळा दुसऱ्याच्याच गळ्यात घातल्याचा चमत्कारीक प्रकार उरुळीकांचन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत घडला असून या ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी आश्चर्यकारक पलटी मारल्याने शेवटची सरपंचपदाची संधी मिळणाऱ्या सदस्याच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली आहे. त्यानुसार उरुळीकांचन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अमित बाबा भाऊसाहेब कांचन यांची ९ विरुद्ध ७ मतांनी निवड झाली आहे.
स्वतः हा ब्रम्हदेव खाली उतरला तरी उरुळीकांचन च्या नेतेमंडळीचा ठावठिकाणा लागणार नाही, अशी उरुळीकांचनच्या राजकारणाबाबत एक म्हण आहे. ती म्हण पुन्हा खरी ठरली आहे. त्यानुसार उरुळीकांचन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कारभाऱ्यांनी ठरविलेल्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा कारभाऱ्यांनीच पराभव केल्याचा लोकांना चिमटा काढायला लावणारा प्रकार बुधवारी घडला आहे. Amit Kanchan
‘जे बोलतील ते करतील’ असं काही नाही असा प्रकार बुधवार (दि.२२) रोजी उरुळीकांचन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत पुन्हा अधोरेखित झाला आहे. साडे तीन वर्षापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वयंभू पद्धतीने निवडून आलेल्या सदस्यांनी सरपंच व उपसरपंचपदाची वर्गवारी करुन कारभार केला. परंतु एका दिवसापूर्वी शब्द दिलेल्या उमेदवाराचा पराभव घडवून आणण्याचा योग घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार अमित भाऊसाहेब कांचन यांनी मिलिंद जगताप यांचा ९ विरुद्ध ७ मतांनी पराभव केला आहे. १ मत निवडणुकीत बाद झाले आहे. त्यामुळे उरुळीकांचन सरपंचपदाच्या निवडणूकी ची चांगलीच चर्चा बाजारात रंगली आहे. एक दिवसापूर्वी शब्द देणारे कारभारी कोणते आणि बदललेले कारभारी कोमते म्हणून चर्चांचा सिलसिला गरमागरम झाला आहे.