GBS आजाराची दहशत असताना पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून आली एक चांगली बातमी, नेमकं काय घडलं?

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे गुलेन बारी सिंड्रोम, या जीबीएस आजाराने दहशत निर्माण केली आहे. या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली, काही रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आता GBS आजारावरील उपचारांबाबत एक चांगली बातमी आहे. त्यामुळे या आजाराची लागण झालेल्या रुग्णांच मनोबल वाढू शकतं. पुण्यातील ससून रुग्णालय येथे गुलेन बारी सिंड्रोम जीबीएस आजाराच्या पाच रुग्णांना एकत्रित डिस्चार्ज देण्यात आला.
यावेळी या रुग्णांना फुलांचा पुष्पगुच्छ देत, पेढे भरवत डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी या रुग्णांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळालं. यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र रुग्णसंख्या वाढत चालली आहे. पुण्यात या आजाराचे 149 संशयित रुग्ण आढळून आले. तीन संशयित रुग्णांचा मृत्यू देखील झाला.
यामुळे शहरात चिंतेच वातावरण निर्माण झालं होतं. ससून रुग्णालयात जीबीएस आजाराचे 28 रुग्ण आहेत. आज डिस्चार्ज मिळालेल्या पाच रुग्णांना ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देण्यात आले. यामुळे रुग्णांच्या चेहेऱ्यावर आनंद दिसून आला.
यावेळी अधीक्षक डॉ. यलप्पा जाधव, डॉ. रोहिदास बोरसे, डॉ. एच. बी. प्रसाद हे उपस्थित होते. ससूनमध्ये उपचार घेणाऱ्या GBS रुग्णांना मोफत उपचार देण्यात येत आहे. यावेळी रुग्ण तसेच रुग्णाच्या नातेवाईकांच्या चेहेऱ्यावर समाधान पाहायला मिळालं.