मंचरमध्ये ACB ची मोठी कारवाई! आंबेगाव – जुन्नर प्रांतअधिकारी गोविंद शिंदे दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटकेत…


पुणे : पुणे जिल्ह्यातील मंचर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत उपविभागीय अधिकाऱ्याला रंगेहात पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

तक्रारदार हे बांधकाम व्यवसायिक असून ते एका भागीदारी फर्मचे भागीदार आहेत. संबंधित फर्मने नारायणगाव येथे पुणे-नाशिक महामार्गालगत जॉइंट व्हेंचर प्रकल्पांतर्गत इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. इमारतीचे सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदाराने अंशतः पूर्णत्व प्रमाणपत्रासाठी उपविभागीय कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता.

मात्र, उपविभागीय अधिकारी गोविंद पंढरीनाथ शिंदे यांनी सुरुवातीला 5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यानंतर तक्रारदाराने दि. 24 मार्च 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर 27 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ने पडताळणी केली असता आरोपी अधिकाऱ्याने 2 लाख रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सापळा रचून दि. 27 मार्च 2026 रोजी दुपारी 3:03 वाजता मंचर येथील उपविभागीय कार्यालयात आरोपी अधिकारी गोविंद पंढरीनाथ शिंदे यांना तक्रारदाराकडून 2,00,000 रुपये लाच स्वीकारताना ACB च्या पथकाने रंगेहात पकडले.

या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!