Ambadas Danve : मोठी बातमी! राज्यातील विरोधी पक्षनेता पुन्हा फुटणार? मातोश्रीवर मनधरणीचे प्रयत्न, राजकीय भूकंप होण्याची शक्यता….
Ambadas Danve : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार असून, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे.
ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यावरून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. अंबादास दानवे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना थेट मातोश्रीवर बोलावून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न देखील झाल्याचे माहिती समोर आली आहे.
संभाजीनगर या ठिकाणाहून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अंबादास दानवे इच्छुक आहेत. याआधी देखील त्यांनी तसे बोलून दाखवले होते. मात्र माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे दानवे नाराज असल्याची माहिती मिळत आहे. Ambadas Danve
अंबादास दानवे यांची नाराजी लक्षात घेता त्यांना थेट मातोश्रीवर बोलावण्यात आले होते. त्याचबरोबर तुमची प्रचारासाठी राज्यामध्ये गरज असल्याचे देखील त्यांना सांगण्यात आले होते. संजय राऊत यांच्याकडून देखील दानवे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
भविष्यात काय घडेल सांगता येणार नाही : अंबादास दानवे
निवडणुकांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. आपण अशी मागणी देखील पक्षाकडे केली आहे. याबाबत अजून कोणताच निर्णय झालेला नाही. मी एक निष्ठावंत शिवसैनिक असून संघर्ष हा माझ्यासाठी नवीन नाही. त्यामुळे भविष्यात काय होऊ शकते हे आता सांगता येणार नाही. असे अंबादास दानवे म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.