अंबादास दानवेंनी डॉक्टर तरुणीच्या पत्रातील ‘ती’ दोन नावं समोर आणली, ‘या’ राजकीय नेत्याचं कनेक्शन समोर…

सातारा : सातारा जिल्ह्याच्या फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे. तिने आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहून आयुष्याचा शेवट केला आहे.

आपल्या मृत्यूस पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदाने आणि प्रशांत बनकर नावाची व्यक्ती असल्याचा उल्लेख त्यांनी हातावर लिहिलेल्या नोटमध्ये केला आहे. पीएसआय बदाने याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला. तर प्रशांत बनकरने आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचं तिने हातावर लिहिलेल्या नोटमध्ये म्हटलं आहे.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येसाठी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा राजकीय दबाव कारणीभूत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला. मृत डॉक्टर तरुणीने डॉ. धुमाळ यांना लिहलेल्या पत्रात स्पष्टपणे त्याचा उल्लेख केला आहे.

पोस्टमार्टेम रिपोर्ट आणि फिटनेस सर्टिफिकेट बदलण्यासाठी पोलिसांकडून येथील डॉक्टरांवर दबाव आणला जायचा. अशाच एका प्रकरणात फलटणमधील भाजपच्या माजी खासदाराचे दोन स्वीय सहाय्यक रुग्णालयात गेले होते. या दोघांनी डॉक्टर तरुणीचे माजी खासदाराशी बोलणे करुन दिले.
यावेळी खासदारांच्या पीएने आणि पोलीस अधिकारी गोपाळ बदने याने संबंधित तरुणीला ती बीडची असल्यावरुन हिणवले, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. ते शनिवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
हा सगळा प्रकार पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्याकडे गृहखात्याचा कारभार आहे, त्यांचे खात्याचे लोक कशाप्रकारे डॉक्टरांशी वागतात, हे दिसून आले आहे. त्यांच्यामध्ये सत्तेचा माज दिसतो. आत्महत्या केलेली डॉक्टर तरुणी प्रामाणिकपणे आपले काम करत होती.
डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सातारा जिल्ह्यातील अधिकारी चौकशीसाठी नको. महिला अधिकारी चौकशीसाठी नेमा. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देखील या प्रकरणात सहआरोपी करा. तसेच महाडिक नावाच्या पोलीस अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करा. काही दिवसांपूर्वी महाडिक हा अधिकारी प्रमोशन होऊन डीवायएसपी म्हणून नंदूरबारला गेला. महाडिक हा अधिकारी माजी खासदारांचा दलाल होता, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.
यावेळी अंबादास दानवे यांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येशी संबंध असल्याचा आरोप केला. तरुणीच्या पत्रात माजी खासदारांच्या दोन स्वीय सहाय्यकांचा उल्लेख आहे. मात्र, त्यांची नावे दिलेली नाहीत. ही नावं मी तुम्हाला सांगतो.
राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक हे दोघे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पीए होते. त्यांनीच डॉक्टर तरुणीचे माजी खासदारांशी फोनवरुन बोलणं करुन दिलं. याच दबावातून तरुणीने आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये तसा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे या सगळ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
