पुण्यात रेड अलर्ट !! ‘या’ जिल्ह्यांना देखील दिला इशारा, घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा…
पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आले असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसाचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली आहेत. अशातच आज पुन्हा हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.
पुण्यासह पालघर, सातारा, ठाणे आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट तर मुंबई, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून आज पुन्हा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच इतर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्याशिवाय पुण्यातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे जर तुमचे महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, चंद्रपुरात जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने येथील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली आहे. तसेच मुंबई उपनगरांतही पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे.