पाटसमध्ये गोळीबार? कथित खंडणीखोर बोगस पत्रकाराने पोलिसांच्या गाडीवर घातली गाडी, आणि…
दौंड : पाटस येथे सोलापूरच्या एका कथित बोगस पत्रकाराच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडली. पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, तो पोलिसांच्या गाडीवरच गाडी घालण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळे त्याच्या गाडीच्या चाकावर गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
खंडणी विरोधी पोलीस पथक एका गुन्ह्याच्या तपासकामासाठी पुणे वरून सोलापूर कडे जात असताना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस येथे सोलापूर जिल्ह्यातील ‘एमएच १३ न्युज सोलापूरकरांच्या हक्काचं’ असा लोगो असलेली गाडी थांबवण्याचा प्रयत्न हे पोलीस पथक करीत होते.
मात्र या गाडीच्या वाहन चालकाने गाडी न थांबवता पोलिसांच्या गाडीवर मागेपुढे करत गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या गाडीच्या चाकावर गोळीबार केल्याचे समजते.
दरम्यान, संबंधित पत्रकारावर पुणे येथे गुन्हा दाखल असल्याचे समजते. त्या तपासासाठी हे पोलीस पथक त्याच्या मागावर होते. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.