गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! पुण्यातील या भागात सर्व वाहनांना बंदी, जाणून घ्या संपूर्ण माहिती..

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती खरेदीची गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. विशेषतहा शिवाजीनगर येथील डेंगळे पूल परिसरात मूर्ती विक्रीसाठी विक्रेत्यांनी स्टॉल्स उभारले असून, प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि वाढत्या गर्दीचा विचार करून मंगळवार (दि. 26) आणि बुधवार (दि. २७) या दोन दिवसांत या भागातील रस्त्यांवर फक्त पादचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, गर्दी टाळण्यासाठी काही रस्त्यांवर वाहतूक पूर्णपणे बंद केली जाईल. छत्रपती शिवाजी रस्त्यावर गाडगीळ पुतळा चौक ते मंडईतील गोटीराम भैय्या चौक हा मार्ग दोन दिवस वाहतुकीसाठी बंद राहील. याऐवजी वाहनचालकांनी संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक आणि शाहीर अमर शेख चौक या मार्गांचा पर्याय वापरावा.
तसेच, जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौक, खुडे चौक मार्गे कुंभारवाड्याकडे जाणाऱ्या वाहनांनी छत्रपती शिवाजी पुलावरून डावीकडे वळून संताजी घोरपडे मार्गाने सारसबाग आणि कुंभारवेसकडे जावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. डेंगळे पूल परिसर, सारसबाग, मुंढवा येथील केशवनगर परिसरातही वाहतूक बदल लागू राहतील.

प्रचंड गर्दी होणार असल्याने मध्यवर्ती भागात वाहन पार्किंगला मनाई करण्यात आली आहे. कामगार पुतळा ते छत्रपती शिवाजी पुतळा, संताजी घोरपडे पथ ते गाडगीळ पुतळा, टिळक पूल ते भिडे पूल आणि छत्रपती शिवाजी रस्त्यावरील शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक या भागात कोणत्याही प्रकारची वाहने लावण्यास बंदी आहे. नागरिकांनी मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा, नीलायम चित्रपटगृह परिसर येथे पार्किंगची व्यवस्था केली आहे, तिथे वाहने उभी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक शाखेने नागरिकांना उत्सवाच्या काळात शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. खाजगी कार मध्यवर्ती भागात आणू नयेत. विसर्जन मिरवणुकीसाठी वेगळ्या वाहतूक योजना आखल्या आहेत. उत्सवाच्या दिवसांत मध्यभागात जड वाहनांना संपूर्ण बंदी असेल.
दरम्यान, गर्दी टाळण्यासाठी शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसमार्गात बदल करण्यात आला आहे. या बस आता स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे), जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना आणि टिळक रस्ता मार्गे स्वारगेटकडे जाणार आहेत. महापालिका भवन परिसरातून सुटणाऱ्या बसदेखील जंगली महाराज रस्त्याने स्वारगेटकडे जातील.