मोठी बातमी! अजित पवार गटाचे सगळे आमदार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्यात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा सामना पाहायला मिळाला. यानंतर काल अचानक अजित पवार आणि त्यांच्या सोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेले सर्व मंत्री आणि आमदार शरद पवारांच्या भेटीला पोहचले होते.
तसेच, महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे, या पार्श्वभूमिवर राज्यात वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. कालदेखील अजित पवार आणि त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार आपल्या गटाचे सर्व आमदार सोबत घेऊन यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत.
काल अजित पवार गटाचे नेते न सांगता शरद पवार यांच्या भेटीला आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सर्व मंत्री होते. आज अजित पवारांसोबत जवळपास ३० आमदार याठिकाणी आले आहेत.
मात्र, आज अजित पवार हे आधी वेळ घेऊन शरद पवार यांच्या भेटीला आल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार काहीवेळापूर्वीच सिल्व्हर ओकवरुन निधून यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत.
याठिकाणी शरद पवार गटाचे रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाडही उपस्थित राहणार आहेत. आता याठिकाणी बैठकीला सुरुवात झाली असून त्यामधून काय निष्पन्न होणार, हे पाहावे लागेल.