सोनिया गांधींचा तुर्तास निवृत्तीचा विचार नाही…!
रायपूर : छत्तीसगडमधील रायपूर येथे काँग्रेसच्या ८५व्या राष्ट्रीय अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता. या अधिवेशनात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला जास्त समाधान आहे, असे विधान केले.
या विधानानंतर सोनिया गांधी राजकारणातून निवृत्त होणार का ?असे प्रश्न विचारले जात होते. यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या अल्का लांबा यांनी सांगितले आहेत की, सोनिया गांधी राजकारणातून निवृत्त होणार नाहीत.
काँग्रेस अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या प्रवक्त्या अल्का लांबा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोनिया गांधींनी केलेल्या विधानाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. लांबा म्हणाल्या, सोनिया गांधी यांच्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढू नये. त्यांनी राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. आगामी काळातही त्या हा निर्णय घेणार नाही, असे सोनिया गांधी यांनी सांगितले आहे, अशी माहिती अल्का लांबा यांनी दिली आहे.