Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेला मारण्यापूर्वी पोलिसांनीच त्याचा खिशात कागद ठेवला, अक्षयच्या आई-वडिलांच्या भयंकर आरोपाने खळबळ…

Akshay Shinde Encounter : बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या तसेच सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. बदलापूरमधील एका शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने हे दृष्कृत्य केले आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे. आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्याची माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याने पोलिसांकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाला.
त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याच्या डोक्यात गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

बदलापूर प्रकरणातील इतर सहा आरोपींना वाचवण्यासाठी माझ्या मुलाचा बळी देण्यात आला, असा आरोप अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केला. अक्षय शिंदे याच्या आईने पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. Akshay Shinde Encounter
अक्षयच्या आईने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, पोलीस आम्हाला काहीच बोलले नाहीत. आम्ही अक्षयला भेटायला तुरुंगात गेले होते तेव्हा त्याने मला विचारले, ‘मम्मी मला कवा घेऊन जाणार तुम्ही?’ मी त्याला म्हणाले की, मी वकिलांशी बोलून घेते, आपण एका महिन्यानंतर तुला सोडवू. त्यानंतर मी अक्षयला विचारले की, तुला खायला-प्यायला देतात का? त्यावर अक्षयने, हो मला खायला देतात, असे सांगितल्याचे आईने म्हटले.
अक्षयने मला जेलमध्ये एक मोठा पेपर दाखवला. यामध्ये काय आहे वाचून बघ असे तो म्हणाला. पण मला वाचता येत नाही. तो पेपर अक्षयच्या खिशात ठेवला होता. त्यामध्ये काय लिहलं होतं, माहिती नाही. मात्र, पोलिसांनीच तो पेपर मुद्दाम अक्षयच्या खिशात ठेवला असेल.
त्या लोकांनीच मुद्दाम,हा पोरगा असं करुन घेणार, असे कागदावर काहीतरी लिहून, तो अक्षयच्या खिशात ठेवला असावा. त्या लोकांना अक्षयला मारायचं होतं, म्हणूनच त्याच्या खिशात ती पावती ठेवली असेल. पोलीस आता खोटं बोलत आहेत. त्यांना कोणीतरी पैसे दिले आहेत, असा आरोप अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी केला आहे.