अजितदादांची तरुणांसाठी मोठी घोषणा, ५० लाख नवीन रोजगार होणार निर्माण..

मुंबई : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सोमवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मांडला. अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश दाखवले. त्यासाठी लाडक्या बहिणींचा आभार मानले.
अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत महत्त्वाच्या घोषणा केल्या. आगामी औद्योगिक धोरण २०२५ लवकरच जाहीर करण्यात येणार असून, याअंतर्गत २० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० लाख नवीन रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे. तसेच, राज्यात चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र धोरण आखले जाणार आहे.
अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी राज्यातील गुंतवणुकीवर भर दिला. ते म्हणाले की, पायाभूत सुविधा विकसित केल्यामुळे देशी आणि परदेशी गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी वाढत असून उत्पन्नातही वाढ होत आहे. येत्या काळात राज्यात १५ लाख ६५४ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, १६ लाख नवीन रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, सरकारने १००० दिवसांसाठी सात कलमी कृती आराखडा तयार केला आहे, ज्यामुळे प्रशासन अधिक पारदर्शक होईल. तसेच, उत्कृष्ट काम करणाऱ्या शासकीय कार्यालयांचा सन्मान केला जाणार आहे.
राज्यात औद्योगिक धोरण २०२५ लवकरच सादर केले जाणार असून, त्याअंतर्गत २० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र धोरण आखले जाणार असून, नवीन कामगार नियम तयार करण्याचीही प्रक्रिया सुरू असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.