राज्यात अजितदादांनी गेम फिरवला, काँग्रेसला सर्वात मोठा हादरा, बड्या महिला नेत्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश…

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत, अनेक दिग्गज नेत्यांंनी महाविकास आघाडीची साथ सोडली असून, महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. सध्या शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तीनही पक्षात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पाहयला मिळत आहे.

यामध्ये आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या आता राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. प्रतिभा शिंदे यांनी जाहीर केले आहे की, त्या एकट्या नसून, त्यांच्यासोबत २० ते २५ हजार कार्यकर्तेही अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. हा काँग्रेससाठी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

या पक्षप्रवेशाच्या निर्णयामागचे कारण सांगताना प्रतिभा शिंदे म्हणाल्या की, ज्या आशा आणि अपेक्षा घेऊन त्या काँग्रेसमध्ये गेल्या होत्या, त्याला अपेक्षित असा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांना बैठकांना बोलावले जात नव्हते आणि पद असूनही काम करण्याची संधी दिली जात नव्हती, अशी त्यांची राज्य पातळीवर नाराजी होती.
त्यांनी राहुल गांधी यांचे आभार मानले, कारण त्यांनी त्यांना पक्षात घेऊन पद दिले होते. मात्र, प्रत्यक्षात काम करण्याची संधी मिळाली नाही. प्रतिभा शिंदे यांनी घोषणा केली आहे की, येत्या १७ ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्या २० हजारांहून अधिक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यावेळी काम करण्यासाठी पदाची आवश्यकता असते आणि अजितदादांनी त्यांना योग्य पद देण्याचे आश्वासन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.