अजित पवारांच्या आमदाराच्या अडचणी वाढणार ; पुण्यातील’ या’ विधानसभा मतदारसंघात फेर मतमोजणी होणार

पुणे : मागील विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्याच्या आरोपांमुळे वाद निर्माण झाला होता. अनेक पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. या मागणीनुसार आता शहरातील सर्वात मोठा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या हडपसर मतदारसंघाची फेरमतमोजणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आमदाराच्या अडचणी वाढणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेत महाविकास आघाडीच्या 105 उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत निवडणूक आयोगाने मूळ मतमोजणी न करता मॉक पोलद्वारे मतदान मोजण्याचा निर्णय दिला होता. याविरोधात काही उमेदवार सुप्रीम कोर्टात गेले होते. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप हे देखील होते. आता या उमेदवारांची फेरमतमोजणीची मागणी मान्य करण्यात आली असून फेर मतमोजणी होणार असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली होती. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने चेतन तुपे यांना तर राष्ट्रवादीचे अजित पवार गटांचे प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली होती. यामध्ये जगताप यांचा पराभव झाला होता. निवडणूक आयोगाच्या निकालावर त्यांनी मतदारसंघात फेरमतमोजणी करण्याची मागणी केली होती.प्रशांत जगताप यांची फेर मतमोजणीची मागणी मान्य झाली आहे.त्यामुळे आता अजित पवारांच्या आमदारांचा अडचणी वाढणार आहेत.
दरम्यान फेर मतमोजणीची मागणी मान्य झाल्यानंतर प्रशांत जगतापां नी प्रतिक्रिया दिली.. ते म्हणाले, हडपसर विधानसभा मतदारसंघातून 2024 ची निवडणूक मी लढवली होती. या निवडणुकीच्या निकालानंतर मतदार यादी, ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट बाबत माझे काही आक्षेप होते. त्याबाबत निवडणूक आयोगाकडे दाद देखील मागितली होती. हडपसर मतदारसंघातून ज्या संशयास्पद 27 ईव्हीएम मशीन तपासणीसाठी 12 लाख 74 हजार रुपये निवडणूक आयोगाकडे भरले होते. त्यानंतर या 27 मशीन मोजण्यास निवडणूक आयोगाने सकारात्मकता दाखवली होती. मात्र, त्यांचे मूळ मतदान न मोजता मॉक पोल घेऊन त्या मशिनची पडताळणी करण्यात येणार होती. त्यासाठी जे मूळ मतदान झालं आहे ते मिटवण्यात येणार होतं. त्या विरोधात काही उमेदवार हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते. त्यानंतर आता या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण निर्णय समोर आला आहे.
दरम्यान आता 25 जुलैपासून हडपसर विधानसभा मतदारसंघातील ज्या 27 मशीन बाबत आम्ही आक्षेप नोंदवला आहे. त्याची मतमोजणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.