अजित पवारांकडून कृषी मंत्रिपदाची पहिली ऑफर मलाच, छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट..

मुंबई :विधिमंडळाच्या सभागृहात ऑनलाईन रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्याकडून आता कृषीखातं काढून घेण्यात आलं आहे. हेच कृषीमंत्रिपद आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

तर कोकाटे यांना क्रीड मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्व घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून कृषीमंत्रिपद फारच चर्चेत आहे. असे असतानाच आता या पदाविषयी अन्न व नागरी पुरवाठमंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
छगन भुजबळ नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना यांनी कोकाटे यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य केले. तसेच त्यांनी या मंत्रिपदाविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषीमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर मला दिली होती.

मात्र कृषीमंत्री या पदाला ग्रामीण भागातील व्यक्ती या पदाला जास्त न्याय देऊ शकते, अशी माझी त्यावेळी भूमिका होती, असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला. तसेच कुठलेही खाते लहान मोठे नसते. आपण काय काम करतो यावर सगळे अवलंबून असते, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
या संवादादरम्यान छगन भुजबळ यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर न्यायालयाने दिलेल्या निकालावरही प्रतिक्रिया दिली. अभ्यास करून न्यायव्यवस्थेत काही बदल करणे गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं. तसेच “तुरुंगात गेलेली वर्षं कोण भरून देणार?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी आपली वेदना मांडली.