अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं..

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीड दौऱ्यावर आहेत. बीडचे पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीची ते बैठक घेणार आहेत. पण त्याआधी सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना मोठा धक्का बसला आहे.

जिल्हा नियोजन सदस्य समितीमधून सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्याजागी राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित तर भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डीपीडीसीच्या बैठकीला नामनिर्देशित सदस्यांना स्थान देण्यात येतं. यामध्ये आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांना स्थान देण्यात येतं. परंतु बीडमध्ये पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सुरु झालेल्या बैठकीला धस आणि सोळंकेंना डावलल्याचं माहिती आहे.

विशेष म्हणजे संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, नमिता मुंदडा आणि पर्यायाने धनंजय मुंडे यांना नियोजन समितीच्या बैठकीत स्थान आहे. तसेच बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनाही बैठकीत स्थान आहे.
दरम्यान, पुण्यात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक होतेय. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी चार वाजता होणार असलेल्या या बैठकीत निधी वाटपावरुन सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
