अजित पवारांची लाडक्या बहिणींना स्पष्टच सांगितलं, ‘ही’ एक गोष्ट करावीच लागणार, नाहीतर 1500 रुपये बंद…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
अशातच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने दिवाळी सणाच्या तोंडावरच हा हप्ता वितरित करण्यात आल्यामुळे राज्यातील ‘लाडक्या बहिणींची’ दिवाळी आजपासूनच गोड होणार आहे.
आता काही दिवसांपूर्वी या योजनेतील लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य ठरवण्यात आलं आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर केवायसीसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
तसेच २ महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर ज्या महिला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत. त्यांना लाडकी बहिण योजनेचा हप्ता मिळणार नाही. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे.
अजित पवार म्हणाले की, केवायसी करताना अडचणी येत आहेत. ऑगस्टमध्ये लाडकी बहीण योजना आणली तेव्हा सुरुवातीला काही गोष्टींमध्ये शिथिलता ठेवली होती. परंतु, आता हा निधी त्याच लाडक्या बहिणींना मिळेल जी पात्र लाभार्थी असेल. त्यासाठी आपण केवायसी करतोय. आपण मुदत वाढवायची असेल तर करु. पण केवायसी ही करावीच लागणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.