Ajit Pawar : अजितदादा निवडणूक लढणार नाहीत? बड्या नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण, राज्यात पुन्हा राजकीय हालचाली?

Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून स्वत: रिंगणात न उतरता आपला मुलगा जय पवार यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांच्याकडून देण्यात आले आहेत.
मी सात-आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलोय. आता मला रस नाही. जय पवार यांच्याबाबत जनता आणि पक्षाचे कार्यकर्ते निर्णय घेतील, असे वक्तव्य अजित पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
अजित पवार यांनी तसं सूचक वक्तव्यदेखील केलं आहे. अजित पवार यांच्या याबाबतच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार आगामी विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवणार नाहीत का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
या चर्चांवर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी लढणार नाही असं वक्तव्य अजित दादांनी केलेलं नाही. विनाकारण दादांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. विधानसभेच्या निवडणुका महायुतीत राष्ट्रवादी पक्ष अजित दादांच्या नेतृत्वात लढणार आहे. Ajit Pawar
पक्षाला यश अधिक कसे मिळवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दादा नेमकं कुठल्या उद्देशाने म्हणाले ते दादांशी चर्चा करून तुम्हाला कळवीन, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे.
विरोधकांकडे लक्ष देण्याची आवश्यकता शिल्लक राहिली नाही. अवसान गळालेले विरोधी पक्षाचे नेते वेगवेगळी टीका आमच्यावरती करत आहेत, असे प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिले. आम्ही अजित दादांच्या नेतृत्वाखाली निवडणुकींना सामोरे जाऊ आणि चांगलं घवघवीत यश मिळवू, असे सुनील तटकरे म्हणाले.
यावेळी सुनील तटकरे यांना आमदार रोहित पवार यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा “अकाली आलेल्या प्रोडक्टबद्दल काही बोलावं असं मला वाटत नाही, अशी खोचक टीका सुनील तटकरे यांनी केली आहे.