पिंपरी-चिंचवडमधून अजित पवार निवडणूक लढवणार, घड्याळाचे ठोके चुकले? समोर आलं वेगळच कारण..

पुणे: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार महापालिकेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं. मात्र त्यानंतर अजित पवार हे नाव असलेला उमेदवार थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मधून अजित पोपट पवार या स्थानिक उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विशेष म्हणजे अजित पोपट पवार हे देखील राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.दरम्यान, काही जणांनी सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारच महापालिकेची निवडणूक लढवत असल्याचा अंदाज बांधला. मात्र, प्रत्यक्षात हे नावाचं साधर्म्य असून उमेदवार वेगळा आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी पुण्याचे सुनील टिंगरे, अंकुश काकडे, चेतन तुपे, रूपाली चाकणकर तसेच पिंपरी-चिंचवडमधून योगेश बहल, विशाल तांबे आणि आमदार माऊली कटके यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते.

दोन्ही शहरांतील स्थानिक समीकरणे लक्षात घेऊन कोणता पक्ष किती जागा लढवणार आणि उमेदवारी कोणाला मिळणार, यावर सविस्तर चर्चा सुरू असताना आता पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार नाव असलेल्या स्थानिक व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत कसं चित्र पहायला मिळणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.