Ajit Pawar : पाडव्याला गोविंद बागेत का गेले नाहीत? अजितदादांची सगळंच सांगितलं…
Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत झाली होती. आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्येही पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. अजित पवार तीन दिवस बारामतीमध्ये आहेत. ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचाही दिवाळीचे चार दिवस मुक्काम बारामतीतच आहे.
तसेच यंदा बारामतीमध्ये पहिल्यांदाच दोन ठिकाणी पाडवा साजरा झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोविंद बागेत पाडवा साजरा केला. तर अजित पवार यांनी काटेवाडीमध्ये पाडवा साजरा केला. यापूर्वी दिवाळी पाडव्याला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येत होते.
मात्र राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजही पवार कुटुंब एकत्र येणार का? उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले होते. मात्र यावेळी अजित पवार यांनी काटेवाडीमध्ये तर शरद पवार यांनी गोविंद बागेत पाडवा साजरा केला. Ajit Pawar
दरम्यान, यावेळी दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याची भेट घेण्यासाठी गर्दी केल्याचं दिसून आले. आता यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आज काटेवाडीमध्ये पाडवा साजरा केला. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भेटण्यासाठी आले होते. त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आज अनेक लाडक्या बहिणी भेटण्यासाठी आल्या.
तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांनी भेट घेतली. माझे जे जुने पत्रकार मित्र आहे, त्यांना आठवत असेल पूर्वी काटेवाडीमध्येच पाडवा साजरा व्होत होता. पाडव्याच्या दिवशी काटेवाडीमध्ये कार्यकर्ते साहेबांना भेटण्यासाठी येत होते. त्यानंतर पुढे गोविंद बागेची जागा घेतली. बारामतीमधील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी सोप आणि सोईचं पडतं म्हणून त्यानंतर पाडवा हा गोविंद बागेतच साजरा व्हायला लागला.
आजही भेटणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी खूप होती. लोकांनाही घरी जायची घाई असते, सण साजरा करायचा असतो. त्यामुळे गर्दी विभागली जावी, कार्यकर्त्यांना लवकर घरी जाता यावं म्हणून मी गोविंद बागेत गेलो नाही. काटेवाडीतच पाडवा साजरा केला. ज्या कार्यकर्त्यांना साहेबांना भेटायचं होतं ते त्यांना भेटले. ज्यांना मला भेटायचं होतं ते मला भेटले त्यामुळे गर्दी विभागली गेली अशी प्रतिक्रिया यावेळी अजित पवार यांनी दिली आहे.