Ajit Pawar : उगीच भावनिक होऊ नका!! शरद पवारांच्या या व्हायरल फोटोनंतर अजित पवार म्हणाले, शेवटच्या सभेत अश्रू देखील..
Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी शरद पवार आणि एकूणच कुटुंबावर चांगलेच तोंड सुख घेतले.
तसेच बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे भाजप शिवसेना व राष्ट्रवादीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचा प्रचाराचा नारळ आज फुटला त्यावेळी जाहीर सभेत बोलताना अजित पवारांनी मतदारांना भावनिक न होण्याचं आवाहन केले आहे.
आज कन्हेरी येथे अजित पवार बोलत होते. बोलताना त्यांनी काल महाविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ फोडताना सुप्रिया सुळे यांच्या सभेतील प्रसिद्ध झालेल्या एका छायाचित्राचा हवाला दिला.
या छायाचित्रात शरद पवार हे खुर्चीवर बसलेले आहेत, तर त्यांच्या अगदी जवळ सुप्रिया सुळे बसलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूला आमदार रोहित पवार आणि नातू युगेंद्र पवार हे बसलेले आहेत असे एक छायाचित्र सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले आहे, हे छायाचित्र खूपच बोलके असल्याने याविषयी नागरिक देखील भावनिक झाले आहेत, याचा हवाला देत आज अजित पवारांनी पुढे काय घडू शकते याची मतदारांना जाणीव करून दिली.
ते म्हणाले, काय दूरदृष्टी आहे पहा.. कालच्या सभेत अमेरिकेतून काही पत्रकार आले होते. पत्रकारांना बातम्या पाहिजेच असतात. त्यामुळे त्यांना बोलावले की ते येतात. पण असा एक फोटो काढला, त्याच्या माध्यमातून अमेरिकेपर्यंत पवार कुटुंब कसे एकीने, एकजुटीने प्रचार करत आहे असे दाखवायचे असावे. पण तुम्ही भावनिक होऊ नका. Ajit Pawar
अजित पवार म्हणाले असेही ऐकायला मिळते की विधानसभेला मला अन लोकसभेला सुप्रियाला मत द्यायचे, परंतु हा तुमच्यात संभ्रम पसरवला जात आहे. अगदी आमचे बंधूही सांगत फिरत आहेत की, आम्ही आमदारकीचे बोलत नाही, आमदारकीला तुम्ही कोणालाही मत द्या, पण खासदारकीला सुप्रियाला मत द्या, परंतु लक्षात घ्या तुम्ही भावनिक होऊ नका. हे सांगतानाच अजित पवार म्हणाले, या पुढच्या सभांवर लक्ष ठेवा.
आता यापुढे ते भावनिक करतील. शेवटच्या सभेवर देखील लक्ष ठेवा. डोळ्यातून अश्रूही काढतील, तुम्ही लक्ष देऊ नका. हा आपल्या प्रपंचाचा विषय आहे. केंद्राकडील निधी आणून आपल्या येथील अनेक योजना मार्गी लावायचे आहेत, त्यामध्ये पाणी योजना आहेत, विविध शासकीय योजना आहेत, त्यामुळे हा विषय भावनिक नाही, हे लक्षात घ्या. ही भावकीची निवडणूक नाही, ही देशाची निवडणूक आहे हेही लक्षात घ्या. असे अजित पवार म्हणाले आहे.