हवेली बाजार समितीच्या निवडणूकीबाबत अजित पवार भूमिका मांडणार का ? अजित पवार यांच्या लोणीकाळभोर कार्यक्रमाकडे तालुक्याचे लक्ष…!

जयदीप जाधव
उरुळी कांचन : लोणीकाळभोर ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमासाठी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे शुक्रवार (ता.३) सायंकाळी लोणी काळभोर ला येत आहे. राज्यात अडीच वर्षांच्या काळात सत्तांतर झाल्यानंतर ते प्रथमच पूर्व हवेली तालुक्यात ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमास हजेरी लावत आहे.अशातच नुकतीच १९वर्षांच्या कालखंडानंतर पुणे -हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सहकार प्राधिकरणाने जाहीर केली आहे. त्यामुळे अजित पवार हे हवेली तालुक्यातील बाजार समितीच्या निवडणूकीविषयी काय भूमिका घेणार म्हणून तालुक्याचे अजित पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.
पुणे-हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे २००३ साली अनागोंदी व अनियमित कारभाराचा ठपका ठेऊन तत्कालीन संचालक मंडळ हे बरखास्त करावे लागले होते. त्यानंतर या बाजारसमितीवर गेली १९ वर्षे सातत्याने सत्ताधाऱ्यांनी सत्तेतून प्रशासकीय कारभार वमर्जीतील अधिकाऱ्यांना बाजार समितीवर नेमणूक करुन प्रशासकीय कारभार करण्याचे कारस्थान रचले गेल्याने तालुक्याला १९ वर्षे बाजार समितीचे अस्तित्व गमवावे लागले आहे. तालुक्यातील जनतेला न्यायालयात जाऊन या बाजार समितीवर लोकनियुक्त संचालक मंडळाच्या निवडणूका घेण्यात याव्या म्हणून न्यायालयीन लढा द्यावा लागला आहे. तर सत्तेतील भाजपच्या तालुक्यातील मंडळींनी या बाजार समितीची निवडणूकीसाठी पूर्वीची रचना असलेल्या कार्यक्षेत्राप्रमाणे या निवडणूकीचा मार्ग मोकळा करण्याचा मोठा निर्णय घेतल्याने या निर्णयाने भाजपच्या विधानसभेच्या तयारी दृष्टीने महत्वाचे ठरले आहे.
भाजपचे तालुक्यात संघटन वाढले असताना,अजित पवार या बाजार समितीच्या निवडणूकीसाठी काय निर्णय घेणार म्हणून राष्ट्रवादी च्या नेतेमंडळी चे लक्ष अजित पवार यांच्या भूमिकेकडे लागले आहे.
अजित पवार यांनी यापूर्वी ही बाजार समितीच्या निवडणूकी संदरर्भात तालुक्यातील महत्वाचा नेते मंडळींचे म्हणणे ऐकन घेतले आहे. मात्र पक्षामार्फत स्वतंत्र पॅनेल उभारून निवडणूक लढण्यावर मौन बाळगले आहे. त्यामुळे लोणीकाळभोर च्या या सभेत अजित पवार ही पक्षाची भूमिका मांडणार का म्हणून तालुक्याचे लक्ष आहे. अशातच लोणीकाळभोर गावातून मधून बाजार समितीच्या अनेक वर्षांच्या निवडणूकीचे आखाडे बांधले गेल्याने अजित पवार नेमकी काय भूमिका मांडणार म्हणून उत्सुकता आहे.
दुसरीकडे तालुक्यात भाजपने ‘वेट अँन्ड वॉच’ भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीची भूमिका ठरल्यानंतर भाजप पक्ष हा नाराजांवर लक्ष ठेवणार आहे. राष्ट्रवादी च्या सहकारातील नेतेमंडळींना बरोबर घेऊन सर्वपक्षीय पॅनेलने निवडणूकीला सामोरे जाण्याची भाजपची तयारी सुरू आहे. अशावेळी अजित पवार हे पक्षातील तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांची स्वबळावर निवडणूक लढण्याची भूमिका मान्य करणार का म्हणून त्यांच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे. हवेली तालुक्यातील जनतेला बाजार समिती १९ वर्षे तर यशवंत कारखाना ११ वर्षे या संस्था तालुक्याला मिळाव्या म्हणून लढा द्यावा लागला आहे. त्यामुळे या संस्थांचे अस्तित्व भविष्यातील राजकारणाला उचल देणार आहे अशी चिन्हे दिसू लागली आहेत.