राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय.? अजित पवार आमचेच नेते, शरद पवार यांचे मोठे वक्तव्य…
बारामती : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एका वक्तव्यामुळे आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचेच नेते आहेत, वेगळा निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार आहे, वेगळा निर्णय घेतला म्हणून पक्षामध्ये फूट पडत नाही, असे वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
काही लोकांनी पक्ष सोडून वेगळी भूमिका घेतली आहे, तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच पक्षात फूट म्हणायचं काही कारण नाही, तो त्यांचा निर्णय आहे, असे पवार म्हणाले.
गुरूवार (ता. २४ ) खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांबाबत विधान केले होते. अजित पवार हे आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतली असल्याने त्याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, आमच्यातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी आमचा पक्ष एकच आहे. अजित पवार हे आमच्याच पक्षाचे नेते आहेत, असा दावाही खासदार सुळे यांनी केला होता. सुळेंच्या वक्तव्याला आज शरद पवारांनी दुजोरा दिला आहे.