Ajit Pawar : लोकसभा निवडणूक झाल्यावर अजितदादा आणि साहेब येणार एकत्र? अजित पवार म्हणाले, एकदा मतदान होऊ द्या…

Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या रंजक घडामोडी सुरु आहेत. कन्हेरीच्या मारोती मंदिरात नाराळ फोडत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढत असलेल्या बारामती मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अजित पवार भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पवार कुटुंबाच्या एकीला तडा गेला होता.

मात्र, २०२४ ची लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील जुनं नातं पुन्हा पूर्ववत होणार का? काका आणि पुतण्या पुन्हा एकत्र येणार का, याविषयी अजित पवार यांनी सूचक भाष्य केले आहे.

यावेळी अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि तुमच्यातील जुन नातं पुन्हा पूर्वीसारखं होणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार यांनी म्हटले की, एकदा ७ तारखेला बारामतीचं मतदान होऊ द्या. तोपर्यंत मी या विषयावर काहीच बोलणार नाही. कारण सध्या बारामतीत वेगळा प्रचार सुरु आहे. आम्ही तर पुढे एकत्रच येणार, असे सांगितले जात आहे. Ajit Pawar
हा प्रचार लोकांना बुचकाळ्यात टाकणारा आहे. त्यासंदर्भात माझे मतदार, सहकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संदेश गेला पाहिजे की, मी जी राजकीय भूमिका घेतली त्याला मी धरुन राहणार आहे. लोकांनी मला साथ द्यावी, मोठ्यांनी आशीर्वाद द्यावेत आणि मतदारांना मला भरभक्कम पाठिंबा द्यावा, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.
