Ajit Pawar : माझा परिवार सोडला तर घरातले सगळे माझ्या विरोधात! अजित पवारांना आलं गहिवरून, कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा, नेमकं बारामतीत घडलं काय?

Ajit Pawar : बारामतीत अजित पवार गटाचा बुथ कमिटी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. या मेळाव्यास कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येने गर्दी केली होती. यावेळी पवार यांनी बोलताना पक्षात मध्यंतरी नेमकं काय घडलं हे सांगताना अजित पवारांना गहिवरून आले.
त्यांनी कार्यकर्त्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. आता आमच्या कुटुंबातील वरिष्ठ म्हणजे शरद पवार आणि दुसरे वरिष्ठ म्हणजे प्रतापराव पवार यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत त्यांनी सांगितले की, मी आणि माझा फक्त परिवार वगळता कुटुंबातील सारे जण माझ्या विरोधात प्रचार करणार आहेत. तुम्ही भावनिक होऊ नका, मला एकटे पाडायचे काम सुरू आहे. Ajit Pawar
मी यांच्या पोटी जन्माला आलो नाही हा काय माझा दोष झाला का? मी सख्ख्या भावाचा मुलगा आहे ना? असे म्हणताना अजित पवारांना गहिवरून आले. अजित पवार असे म्हणताच कार्यकर्ते उठले. कार्यकर्ते देखील गहिवरले आणि त्यांनी आत्ताच उमेदवाराचे नाव जाहीर करा, आम्ही त्यांना निवडून आणल्याशिवाय राहत नाही असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या पवित्र्यामुळे काही काळ अजित पवारांना शब्द सुचले नाहीत.
दरम्यान, यावेळी अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले मी काम करतो. मला कामाची आवड आहे. मला सेल्फी काढायची सवय नाही. पण अलीकडे काही जण फोन करू लागले आहेत, कसे काय, पाणी आहे का? आता हा काय प्रश्न झाला का? लोकसंपर्क आता त्यांना सुचत आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.