अजित पवारांनी वाढवले इच्छुकांचे टेन्शन, म्हणाले, हवेलीत जुन्यांनी अपेक्षा धरू नये…!

उरुळी कांचन : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हवेलीत जुन्या इच्छुकांचे टेन्शन वाढवले आहे. बाजार समिती निवडणुकीसाठी जागा कमी आणि इच्छुकांची संख्या जास्त आहे. नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे जुन्या लोकांनी फार काही अपेक्षा धरू नयेत, असे अजित पवार म्हणाले.
पक्षीय स्तरावर पॅनेल करण्याबाबत अंतिम निर्णय लवकर घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्त आयोजित मतदार मेळाव्यात अजित पवार बोलत होते.
ते म्हणाले, हवेली बाजार समितीच्या तत्कालीन बरखास्त केलेल्या संचालक मंडळाच्या कारभाराच्या चौकशा सुरू आहेत. त्याचा निकाल लागेल तो लागेल. आपल्यावर टाकलेली जबाबदारी इमाने इतबारे पार पाडायची असते.
पारदर्शक कारभार केल्यास समाजासाठी चांगले काम होते. काहीजण केवळ पत्रिकेवर संचालक नाव लागावे म्हणून संचालक मंडळात जातात. बाजार समितीचे संचालक व्हायचे तर वेळ देता आला पाहिजे. बाजार समितीमधील गळती, वजनकाटे आदी खूप बाबी आहेत.
पेट्रोल पंपासारख्या योजना बाजार समितीसांठी उत्पन्नवाढीसाठी चांगल्या आहेत. मात्र, पंपाची कॅश घेता कामे नये, असे चिमटेही पवार यांनी मागील संचालकांना काढले. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.