राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी अजित पवारांनी घेतल्या होत्या तब्बल 14 बैठका?दोन्हीकडूनही हिरवा कंदील, पण…

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार की नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं असताना,राष्ट्रवादी एकत्रीकरणासाठी अजित पवारांनी 14 निर्णायक बैठका घेतल्या होत्या अशी माहिती समोर आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार सत्ता, संघटन आणि निर्णयक्षमता या तिन्ही पातळ्यांवर एक मजबूत केंद्र होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक देखील घेतली.अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची शेवटची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आणण्यावर अंतिम सहमती होती.
राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर,अजित पवारांची शरद पवारांशी थेट भेट झाली. या भेटीत देखील शरद पवारांनीही दोन्ही पक्ष एकत्र येण्यास हिरवा कंदील दाखवला होता. जिल्हा परिषद निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी एकत्रिकरण जाहीर करण्याचा निर्णयही झाला. म्हणूनच उमेदवारांना तुतारीऐवजी घड्याळावर लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही संपूर्ण चर्चा केंद्रापर्यंत देखील पोहोचवण्यात आली होती.

संपूर्ण राजकीय प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी एकत्रीकरणासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात आल्याची माहिती असून, शरद पवारांनी कुटुंबप्रमुख म्हणून एकत्रीकरणाची जबाबदारी स्वीकारली आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आणि पक्षाच्या भवितव्यासाठी एकत्र येण्यावर भर दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अचानक निधनाने मात्र राज्याच्या राजकारणाला केवळ धक्का बसलेला नाही तर एक मोठी पोकळी निर्माण झाली. उपमुख्यमंत्री पदाचा प्रश्न त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भवितव्याचा प्रश्न समोर आला.
