Ajit Pawar : गट- तट, जवळचा लांबचा हे सगळं बंद करा! मी हे खपवून घेणार नाही, बारामतीत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना खडसावले..

Ajit Pawar बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार काल बारामती दौऱ्यावर होते. पहाटेपासूनच त्यांनी बारामतीतील विविध विकास कामाची पाहणी केली. शरद पवार यांची साथ सोडल्यावर ते बारामतीत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असते. अजित पवार आपल्या रोखठोक स्वभावाबाबत चर्चेत असतात.
आता बारामतीतील एका खाजगी कार्यक्रमात बोलताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार म्हणाले की, मला माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे, मी ज्या वेळेस कार्यक्रमाला जातो , त्यावेळेस सांगत असतो की, प्रमुख कार्यकर्त्यांची नावे घ्या.
अजून पण काहीजण काहींची नावे जाणीवपूर्वक वगळली जातात. हे मला अजिबात चालणार नाही. तुमच्या गटा-तटा मुळे मला त्रास होतोय. लोक म्हणतात, दादा तुमच्याबद्दल काही नाही, आमचं म्हणणं! पण आजूबाजूला असणारे अशी आहेत असे लोक म्हणतात.
यामुळे हे आता चालणार नाही. ज्यांना ते मनाला लागत असेल त्यांनी नोंद घ्या, दुरुस्त करा. शेवटी आपण माणसं आहोत, पण हे गट तट हा माझ्या जवळचा, माझ्या लांबचा, असलं मी कदापि खपवून घेणार नाही, असा थेट इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
तसेच मी माझा एकटा फिरेल. काय द्यायचे असेल ते लोक मला पाठिंबा देतील. असे स्पष्ट सांगत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघडणी केली. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. माझ्याबरोबर काम करणारा जर पुरुष किंवा माझी भगिनी किंवा माझा युवक किंवा माझी युवती जर चुकीचं वागत असतील तर ते मला कळलं पाहिजे.
माझ्या पाठीला काही डोळे नाहीत. तुम्ही बारामतीकरांनी माझ्या लक्षात आणून दिल पाहिजे, की दादा हे तुमच्याबरोबर सतत वावरत असतात. माणूस असा बघितला तर वेगळा दिसतो आणि अंतरंग त्याची वेगळीच काय काय असतात. Ajit Pawar
अशी पण माणसं समाजामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहतो. बारामतीकरांनो, तुम्हाला जर असं कुठे काही दिसलं तर कृपा करून माझ्या लक्षामध्ये आणून देण्याचं काम करा मला कॉन्टॅक्ट करता आला नाही, तर मी अनेकदा बारामतीमध्ये सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या विकास कामांच्या भेटी चाललेल्या असतात.
तिथं नुसती चिठ्ठी दिली चालेल, पण चिठ्ठी देताना त्यात नाव व फोन नंबर असला पाहिजे. बिगरनावाची चिठ्ठी असेल तर मी काय समजणार? मी त्याच नाव कुठेही जाहीर करणार नाही. ते माझ्यापुरतं त्या बाबतीमध्ये ठेवीन.
पण अशा प्रकारे आपण जर एकमेकांना माहिती द्यायला यशस्वी झालो, तर काम करायला आणखीनच सोप्पं जाईल. असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहे. अजित पवार हे अनेकदा भर सभेत अनेकांना खडसावत असतात. याचा प्रत्येय अनेकदा आला आहे.