Ajit Pawar : पोरांनो पारंपरिक विचार न करता नवे आणि आवडीचे क्षेत्र निवडा, अजित पवारांनी विद्यार्थ्यांना दिला कानमंत्र..

Ajit Pawar पुणे : विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्यसंपन्न पिढी घडविणे ही काळाची गरज असून शिक्षक आणि पालकांनी यासाठी योगदान द्यावे.

तसेच विद्यार्थ्यांनी नव्या काळातील आव्हाने ओळखून पारंपरिक विचार न करता नवे आणि आवडीचे क्षेत्र निवडावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे.
अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. शिक्षकांनी चांगली कामगिरी करत विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करावे. गरीब कुटुंबापर्यंत चांगले आणि दर्जेदार शिक्षण पोहीचविण्याची जबाबदारी शिक्षकांची असून शिक्षकांनी त्यासाठी विशेष प्रयत्न करावे.

तसेच विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा उत्तमरीतीने शिकविता यावी यासाठी ती भाषा आत्मसात करावी आणि चांगले उपक्रम राबवावे. कौशल्याचे आणि नैतिकतेचे शिक्षण देऊन विद्यार्थी गुणवंत, ज्ञानवंत आणि चारित्र्यसंपन्न व्हावा यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन देशाचा नावलौकिक उंचवावा. यशाची शिखरे गाठताना शाळेला किंवा शिक्षकांना विसरू नये. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करताना चांगले मित्र निवडावे.
नैतिकतेचा विसर पडू देऊ नये आणि नियमित व्यायाम करावा. व्यसनापासून दूर रहात आवडते छंद जोपासावे. आपल्या उत्तम कामगिरीत सातत्य राखत शाळेचा आणि देशाचा नावलौकिक उंचवावा, असा संदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.