पुणेकरांसाठी अजित पवारांनी दिली आनंदाची बातमी! गणपतीत पुणे मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार..

पुणे : गणपतीत पुणे मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. गणेशोत्सव मंडळांसोबत अजित पवार यांनी बैठक घेतली. यावेळी मिरवणुका वेळेत पार पाडण्याची विनंती गणपती मंडळांना केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
दहीहंडीच्या वेळेस गोविंदा पथकांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. विसर्जन वेळेवर होण्यासाठी दगडूशेठ गणपतीची मिरवणूक ही दुपारी ४.३० निघणार असल्याचं सांगण्यात आले आहे.
त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा दणक्यात साजरा होणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. तर यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज होणार असल्याचे अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले.
मी आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज बैठक घेतली. ७ तारखेला दहीहंडीचा उत्सव आहे. हा सण लोकप्रिय होत आहे. त्यादृष्टीने पोलिसांना सूचना करण्यात आल्या आहेत. गोविंदांना विम्याचे कवच आम्ही दिले आहे. मंडळांशी सकारात्मक चर्चा झाली. मिरवणुका वेळेत पूर्व व्हाव्यात यासाठी मंडळांना सुचना केल्या आहेत.
दरम्यान, पुण्यात परदेशी पर्यटक येत असतात. त्यामुळे बारकाईने काळजी घेण्यासाठी पोलिस तयार आहेत. मेट्रो रात्री बारावाजेपर्यंत सुरु ठेवली जाणार आहे. विशेषत: ५ ते १० व्या दिवशी ही सेवा बारावाजेपर्यंत सुरु राहील.
गणेश मंडळांना एकदा परवानगी घेतल्यास पुन्हा पाच वर्ष परवानगी घ्यायला लागणार नाही. पुण्यामध्ये राज्यासह देशातून लोक येत असतात. त्यामुळे पोलिस आणि प्रशासन यांना तयार राहण्याच्या सुचना देण्यात आल्याचे ते म्हणाले.