मोठी बातमी! अजित पवार विमान अपघात प्रकरणी अखेर तक्रार दाखल, कोणत्या पोलीस ठाण्यात घेतली दखल?

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. 28 जानेवारी रोजी सकाळी 8.10 वाजता अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले होते.

यादरम्यान बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. हा विमान अपघात इतका जास्त भीषण होता की, विमानातील एकही व्यक्ती जिवंत राहू शकली नाही. अजित पवार यांचा विमान अपघात झाल्याचे कळताच सर्वांना मोठा धक्का बसला.
अशातच आता या अपघात प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला नाही तर हा घातपात आहे, असा आरोप शरद पवार गटाने केला आहे. याप्रकरणी संबंधित विमान कंपनी आणि कटात सामील असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.

२८ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी सुधीर रावसाहेब म्हस्के यांनी केली.
त्यांनी याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांच्या नेतृत्वात हा अर्ज शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. हा अपघात नाही तर घातपात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी अर्जातून करण्यात आली आहे.
या प्रकरणात VSR Ventures Private Limited ही विमान कंपनी, तिचे संचालक विजय कुमार सिंह व रोहित कुमार सिंह, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयचे संबंधित अधिकारी, तसेच इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
तक्रार अर्जात आरोप आहे की, अपघातग्रस्त विमानाची तांत्रिक स्थिती उड्डाणासाठी योग्य नव्हती. मात्र सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून आणि आवश्यक तपासणी न करता विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली, असा गंभीर आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे.
तक्रार अर्जानुसार हा केवळ अपघात नसून संबंधित यंत्रणांचा निष्काळजीपणा आणि नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन यामुळे घडलेली गंभीर घटना असून यात गुन्हेगारी कटाचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.