चाकण शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवार मैदानात! रस्त्यांच्या सुधारणेबाबत दिले महत्वाचे आदेश..

चाकण : येथील चाकण शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी तसंच विकास कामांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज चाकण दौऱ्यावर होते. याबाबत ते म्हणाले, चाकण शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी आणि विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी योग्य ती पावलं तातडीनं उचलली जातील.

तसेच उन्नत मार्गाची कामं भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत (NHAI) करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील एक महिन्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना बैठकीत दिल्या. Elevated Corridor ला वेळ लागणार असल्यानं पर्यायी उपाययोजना म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ३ मीटर रुंदीनं डांबरीकरण केले जाणार आहे.
तसेच रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव पुढे आणण्याबाबत चर्चा बैठकीत झाली. यावर तातडीनं रस्त्याच्या कडेला कठीण मुरुम टाकून मजबुतीकरण करावं, असं सूचित केलं. चाकण चौक, आळंदी फाटा, कुरुळी फाटा, स्पायसर रोड, गणेश साम्राज्य चौक (स्पाइन रोड) येथील चौक सुधारणेचं काम लवकर पूर्ण करावं. अबिठाण चौक, चाकण येथील विद्युत खांब हटवून चौक सुधारणा करावी.

सेवा वाहिन्यांचं काम भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन नियोजनपूर्वक झालं पाहिजे, जेणेकरून पुढे अडचणी निर्माण होणार नाहीत. नगर परिषद हद्दीतील रस्त्यांच्या दुतर्फा फेरीवाल्यांमुळं निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीनं उपाययोजना करावी, याबद्दलही सूचना केल्या आहेत.
तसेच पुणे, पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असेही अजित पवार यांनी सांगितले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने याठिकाणी मोठा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.