Ajit Pawar : अजितदादांची दिल्लीत खलबतं, अमित शाहांची भेट नेमकी कशासाठी? समोर आली महत्वाची माहिती…

Ajit Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली.

महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांना मिळून २३४ जागा मिळाल्या असून, यामध्ये भाजपला १३२ जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर करण्यात आली.
पण महायुतीमध्ये अद्यापही खाते वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले नाही. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांनी दिल्लीत रात्री उशिरा खलबतं केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीच मंत्रिमंडळ आणि अमित शाह यांच्यासमोर कोणत्या मागण्या करायच्या, याबाबतही चर्चा झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये दीड तास मंत्रिमंडळावरती खलबतं झाल्याची माहिती समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुती सरकारमध्ये मिळणाऱ्या खात्यांच्या मंत्र्यांच्या नावाबाबत दीड तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. Ajit Pawar
अर्थ मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम खाते, कृषी मंत्रालय आदी मंत्रालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. जवळपास सात मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अमित शाह यांच्या भेटीसाठी अजित पवार यांनी वेट ॲंड वॉचची भूमिका घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमित शाह हे चंदीगढ इथे शासकीय कार्यक्रमात व्यस्त असल्यानं अजित पवार यांनीा वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. अमित शाह हे दिल्लीत आल्यावर भेट होण्याची शक्यता आहे.
शाह यांची जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत अजित पवार दिल्लीत थांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही खात्यांवर असलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी अजित पवार रात्रीपासून दिल्लीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आज मुंबईमध्ये महायुतीच्या नेत्यांची होणारी बैठक अनिश्चित असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.