Ajit Pawar : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन ११ पोलिस ठाण्यांना मंजुरी, अजित पवार यांची माहिती….

Ajit Pawar : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचे विस्तारीकरण वाढत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे शहरात सात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये चार अशा ११ नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण दौऱ्यादरम्यान दिली आहे.
त्यामुळे या नवीन पोलिस ठाण्यांमधून लवकरच प्रत्यक्षात कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे. पुणे पोलिस आयुक्तालयात समाविष्ट गावांचा समावेश झाला आहे. त्यामळे शहराचा विस्तार वाढत आहे. सध्या पुणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ३२ पोलिस ठाणी आहेत. शहराचा विस्तार लक्षात घेता कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करणे गरजेचे आहे.
भारती विद्यापीठ, सिंहगड रस्ता, हडपसर, वानवडी, कोंढवा, चतु:शृंगी, लोणी काळभोर आणि लोणीकंद पोलिस ठाण्यांचे विभाजन करून नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यानुसार आंबेगाव, नांदेड सिटी, काळेपडळ, फुरसुंगी, खराडी, बाणेर आणि वाघोली ही सात नवीन पोलिस ठाणी प्रस्तावित आहेत.
गृह विभागाने पुण्यात सात नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीस मंजुरी दिली आहे. ही सात नवीन पोलिस ठाणी सुरू झाल्यानंतर पुण्यातील पोलिस ठाण्यांची संख्या ३९ इतकी होणार आहे.
तसेच, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात संत तुकारामनगर, दापोडी, काळेवाडी आणि बावधन अशा नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळाली आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून लवकरच पोलिस आयुक्तालयास आदेश प्राप्त होण्याची शक्यता आहे.