Ajit Pawar : अमित शहांनी भेट टाळली? दिल्लीत कशासाठी गेलो? मुक्काम कशासाठी? अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं…

Ajit Pawar : राज्यात बहुमत मिळवूनही महायुतीने सरकार स्थापन करण्यासाठी मोठा कालावधी घेतला. मुख्यमंत्री दिल्लीतील बैठकीनंतर त्यांच्या मूळ दरे या गावी गेले. तिथून ते ठाण्याच्या घरी गेले. या दरम्यान महायुतीच्या बैठकी झाल्या नाहीत. तीनही पक्षाचे नेते एकत्र दिसले नाही. त्यावरून राज्यात वेगळ्याच चर्चा रंगल्या.
शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. तर दुसरीकडे अजितदादांनी तातडीने दिल्ली गाठल्याने चर्चांना उधाण आले. अजितदादा अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आल्यानंतर राज्यात काहीतरी मोठं नाट्य घडतंय अशा चर्चा झाल्या.
या सर्व प्रकरणावर आता अजितदादांनीच पडदा टाकला आहे. त्यांनी दिल्लीत मुक्काम कशासाठी ठोकला हे दिलखुलासपणे सांगून टाकले. त्यांनी जर-तरच्या चर्चांना आपल्या रोखठोक उत्तराने विराम दिला.
दिल्लीवारीविषयी आज महायुतीच्या झालेल्या पत्रकार परिषदेत अजितदादांनी खुलासा केला. “मी नवी दिल्लीत माझ्याकामासाठी गेलो होतो. मी कुणालाही भेटायला गेलो नव्हतो. माझी पत्नी सुनेत्रा यांना ११ जनपथ हा बंगला दिला आहे. मला घर नीटनेटकं लागतं. त्यामुळे मी आर्किटेक्टला घेऊन गेलो होतो.
आमच्या केसेस चालू आहेत. त्याबद्दल वकिलांना कधी भेटलो नव्हतो. ते प्रफुल्ल पटेल बघायचे. तो विषय संपवा म्हणून वकिलांना भेटलो होतो. जवळच्या नातेवाईकांचं लग्न होतं. या तीन गोष्टीसाठी गेलो होतो.
तसेच तिकडे गेल्यावर आराम करायला मिळतो. त्यामुळे मी अमित शाह यांना भेटायला गेलो होतो डोक्यातून काढून टाका.असे अजितदादा म्हणाले. इतकेच नाही तर तुम्ही मात्र मला अमुक नेत्याने भेट नाकारली वगैरे बातम्या चालवल्या, असा टोला ही त्यांनी लगावला आहे.