Ajit Pawar : अल्पवयीन आरोपीचं वय १८ वरून १४ होणार? अजित पवार करणार अमित शहा यांच्याकडे विनंती…

Ajit Pawar : अल्पवयीन आरोपीचं वय १८ वरून १४ करायला हवं. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत चर्चा करणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. कारण हा विषय केंद्राच्या अखत्यारीतील आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेसाठी शक्ती अभियान सुरु करण्याचाही निर्णय त्यांनी घेतला आहे.

बारामतीत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा नुकताच खून करण्यात आला. खून झालेला व करणारे हे अल्पवयीन आहेत. या पार्श्वभूमीवर पवार यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांसह पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

अजित पवार म्हणाले, खरे तर आता अल्पवयीन गुन्हेगाराची वयोमर्यादा १४ वर्षाच्या आत ठेवण्याची गरज आहे. कारण पूर्वीची मुलांची बुद्धीमत्ता आणि आजची परिस्थिती खूप वेगळी बनली आहे.

या संदर्भात आम्ही गृहमंत्री अमित शहा यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. कारण हा विषय केंद्राशी निगडित आहे. अल्पवयीन गुन्हेगार हा १४ वर्षाच्या खालील गृहीत धरला जावा, अशा स्वरूपाची मागणी आम्ही सरकारच्या वतीने करणार आहोत. असे अजित पवार म्हणाले. Ajit Pawar
शालेय विद्यार्थी १४ वर्षाच्या पुढे गेले की, त्यांचा वापर हा गुन्हेगारीसाठी केला जात असल्याचे राज्यात घडलेल्या विविध घटनांवरून दिसून आले आहे. त्याचबरोबर या मुलांमधील रागावर नियंत्रण न ठेवण्याची वृत्ती यामुळे देखील गुन्हे वाढत आहेत. अल्पवयीन असल्याने त्यांना मोकळीक मिळते.
अशा परिस्थितीत गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अल्पवयीन गुन्हेगाराचे वय १४ वर्षाच्या आत असावे. चौदा वर्षाच्या पुढील प्रत्येक युवक अथवा व्यक्ती हा सराईत अथवा थेट गुन्हेगारीमध्ये गणला गेला पाहिजे. अशी भूमिका सगळीकडे व्यक्त केली जात आहे. त्यासंबंधी राज्य सरकार विचार करत असल्याचे पवार म्हणाले आहे.
