विमान प्रवास महागला! प्रवाशांना मोठा झटका, इंडिगोने तिकीट दरात केली भरमसाठ वाढ, जाणून घ्या…

नवी दिल्ली : हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने आपल्या सर्व विमान फेऱ्यांवर ‘फ्यूल चार्ज’ म्हणजेच इंधन शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे.

इंडिगोने 14 मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी फ्यूल सरचार्ज लागू करण्याचा निर्णय घेतला असून प्रवाशांना आता अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. भारताची मोठी विमान कंपनी इंडिगोने 14 मार्चपासून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय तिकिटांवर अतिरिक्त फ्यूल सरचार्ज आकारण्याची घोषणा केली आहे.
कंपनीच्या माहितीनुसार हा अतिरिक्त शुल्क किमान 425 रुपये ते कमाल 2,300 रुपये दरम्यान असणार आहे. विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन फ्यूलच्या वाढत्या किमतीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. एअरलाईन उद्योगात एव्हिएशन टर्बाइन फ्यूल हा ऑपरेशनल खर्चातील अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो.

एअरलाईन्सच्या एकूण खर्चापैकी जवळपास 40 टक्के हिस्सा या इंधनाचा असतो. मार्च 2026 च्या सुरुवातीपासून जेट इंधनाच्या किमती सातत्याने वाढताना दिसत असल्याने विमान कंपन्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे तिकीट दरांमध्ये वाढ करणे किंवा फ्यूल सरचार्ज लागू करणे हा पर्याय कंपन्यांसमोर उरला असल्याचे सांगितले जात आहे.
इंडिगोच्या निर्णयानंतर भारतातील इतर विमान कंपन्याही अशाच पद्धतीने अतिरिक्त शुल्क लागू करण्याचा विचार करत आहेत. स्पाइसजेट आणि अकासा एअर या कंपन्यांकडून तिकिटांवर फ्यूल सरचार्ज लागू करण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांनीही विमान तिकिटांवर अशाच प्रकारचे अतिरिक्त शुल्क लागू केले होते.
दरम्यान, जागतिक तेल बाजारातील घडामोडींमुळे विमान इंधनाच्या किमतींवर दबाव वाढला आहे. मध्य पूर्व परिसरात वाढत असलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः स्ट्रेट ऑफ होर्मुज या महत्त्वाच्या समुद्री मार्गाबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे तेल बाजार अस्थिर झाला आहे. त्याचबरोबर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत कमी झाल्याने एअरलाईन कंपन्यांवर आर्थिक ताण आणखी वाढला आहे.