वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अखेर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीरपणे मागितली माफी, शेतकऱ्यांच्या संतापानंतर म्हणाले…

नाशिक : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. याबाबत आज अखेर त्यांनी आपल्या वक्तव्यावर जाहीरपणे माफी मागितली आहे. आपण केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करत असल्याचं कोकाटे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात, त्या पैशांचे तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयाची गुंतवणूक आहे का? सरकार तुम्हाला शेतीमध्ये गुंतवणुकीसाठी पैसे देणार आहे. तुम्हाला जलसिंचनाला, शेततळ्याला पैसे, सगळ्या गोष्टींना पैसे. शेतात गुंतवणूक कोण करतं? तर सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, ह्याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडा करा, लग्न करा, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
याबाबत आता ते म्हणाले, अनावधानाने आणि मस्करीने केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान-सन्मान दुखावला गेला असेल तर कालच मी एका चॅनलवर दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा मान-सन्मान दुखावला गेला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. यामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळेल.
राज्यातील तमाम शेतकऱ्यांना समृद्धी आणि सुख मिळो अशी प्रभू रामचंद्रांकडे प्रार्थना केली आहे. त्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांसाठी येणारे दिवस निश्चितच चांगले असतील. यावर माझा विश्वास आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळणारच आहे.
पण यापुढेही शेतकऱ्यांचं कमी नुकसान व्हावं. शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून आज मुहूर्त साधून काळाराम दर्शनाला आलो होतो, असंही माणिकराव कोकाटे यावेळी म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून ते वादात सापडले असल्याचे दिसून आले आहे.