युगेंद्र पवार यांच्या लग्नानंतर जय पवार–ऋतुजा पाटील यांच्या लग्नाची लगबग, 400 जणांचे खास वऱ्हाड बहरीनला जाणार..

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाह सोहळा ३० नोव्हेंबर रोजी मुंबईतील बीकेसी जिओ सेंटर येथे संपन्न झाला. यावेळी अनेक दिग्गज उपस्थित होते. असे असताना आता अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचा मुलगा जय पवार यांचे लग्न बहरीनमध्ये पार पडणार आहे.

जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा ४, ५ आणि ७ डिसेंबर रोजी बहरीनमध्ये पार पडणार आहे. या समारंभासाठी पवार–पाटील कुटुंबीयांकडून केवळ ४०० पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. जवळचे आणि मोजकेच लोकं यासाठी उपस्थित राहणार आहेत. यामुळे या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
या विवाह सोहळ्यासाठी काही दिवसांपासून पवार–पाटील कुटुंबीयांची आणि पाहुण्यांची तयारी जोरात सुरू असून संपूर्ण कार्यक्रम परदेशात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. यासाठी अनेकजण रवाना देखील झाले आहेत. पवार कुटूंबातून कोण कोण उपस्थित राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

युगेंद्र पवार यांच्या लग्नाला अजित पवार हे उपस्थित राहिले नव्हते. त्यांच्या प्रचार सभा असल्याने ते उपस्थित नव्हते. याची जोरदार चर्चा यावेळी झाली. जय पवार यांच्या लग्नासाठी लग्न समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फक्त दोनच नेते निमंत्रित असल्याची माहिती समोर आली आहे. यात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश आहे.
पवार कुटुंबीयांचा मोठा सोहळा असला तरी निमंत्रितांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. अजित पवार देखील काही दिवस राजकीय कामातून लग्नासाठी वेळ काढणार असल्याची माहिती आहे. याबाबत अजून अधिकृतपणे माहिती समोर आली नाही. मात्र लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.