वाल्मिक कराडनंतर मुलगा सुशील कराडचे कारनामेही उघड, आता दोघेही अडकणार? नेमकं कारण काय?

बीड : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सध्या खंडणी प्रकरणात सध्या सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. देशमुख हत्या प्रकरणातही वाल्मिक कराडचा संबंध असल्याचे पुरावे समोर येऊ लागले आहेत.
वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असून याप्रकरणी सातत्याने धनंजय मुंडेंवर आरोप होताना दिसत आहेत. एकीकडे वाल्मिक कराड पोलीस कोठडीत असताना आता त्याच्या मुलाचा अनोखा प्रताप समोर आला आहे.
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडने मॅनेजरला धमकावून मारहाण केल्याच्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड हा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडच्या मॅनेजरने गंभीर आरोप केले आहेत. सुशील कराडने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मॅनेजरच्या पत्नीनेच सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी केली आहे.
इतकेच नव्हे तर, सुशील कराडचे साथीदार अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरूद्धही खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पिडीत मॅनेजरच्या पत्नीने सुशील कराडसह त्याच्या दोन्ही साथीदारांविरोधात सोलापुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन, सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली होती. पण त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली गेली नाही, अशीही माहिती समोर आली आहे.