पुण्यातील सामूहिक अत्याचार प्रकरणानंतर टेकड्याच्यां सुरक्षेबाबत मोठा निर्णय; आता 22 टेकड्या हायटेक…

पुणे : पुण्याहून सासवडला जाणाऱ्या रस्त्यावरील बोपदेव घाट परिसरात काही महिन्यापूर्वी एका महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता.या प्रकरणानंतर पुण्यातील टेकड्यांवरील सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आणि गृह विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत २२ प्रमुख टेकड्यांवर अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ७० कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सध्या बोपदेव घाट परिसरात या योजनेच्या अंमलबजावणीस युद्धपातळीवर सुरुवात झाली असून इतर टेकड्यांवरही लवकरच काम सुरू होईल. शहरातील वेताळ टेकडी, पर्वती, चतुःशृंगी, तळजाई, लॉ कॉलेज टेकडी, सेनापती बापट रस्ता, पाषाण, बोपदेव घाट अशा प्रमुख टेकड्यावरती अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहेत.याठिकाणी पारंपरिक सुरक्षेच्या मर्यादा ओलांडत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक टेकडीवर हाय रिझोल्यूशन IP-आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, जे थेट नियंत्रण कक्षाशी जोडलेले असतील.सुरक्षेच्या दृष्टीने टेकड्यांवर पॅनिक बटणाचीही व्यवस्था असेल, जी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना तत्काळ सूचना देऊ शकेल.
या टेकड्यावरती IP स्पीकर्सद्वारे वेळोवेळी सूचना प्रसारित होतील आणि रात्रीच्या वेळी सुरक्षिततेसाठी फ्लडलाइट्स बसवले जातील. या संपूर्ण यंत्रणेला भूमिगत फायबर इंटरनेट आणि विजेच्या जोडण्या दिल्या जातील, जेणेकरून कुठलीही अडचण निर्माण होणार नाही.
नागरिकांची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल निश्चितच सकारात्मक आणि आश्वासक ठरणार आहे.