मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर लोणी काळभोर ,उरुळी कांचन हे दोन गटांत अनुसूचित जातीसाठी निश्चित ! उर्वरित तीन गटांची आरक्षणांची सोडत शिगेला …

उरुळी कांचन : राज्यात आगामी काळात होणा-या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आरक्षणाची पद्धत पूर्णपणे बदलण्यात आली आहे. २००२ पासून चालू असलेली चक्राकार पद्धत बंद करण्यात आली आहे. या पध्दतीवर नागपूर व मुंबई.उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून प्रभागरचना व आरक्षण सोडतीत सहभाग घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने पूर्व हवेलीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या लोणीकाळभोर व उरुळीकांचन जिल्हा परिषद गटांत अनुसुचित जाती -जमाती वर्गाकरीता आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांत नवीन नियमानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या दोन्ही प्रवर्गांसाठी आरक्षण संबंधित जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्येच्या गटापासून उतरत्या क्रमाने लोकसंख्येवर आधारित निश्चित केले जाणार आहे. या नवीन नियमामुळे पूर्व हवेलीतील लोणी काळभोर व उरुळी कांचन या राजकीय दृष्टिकोनातून संवेदनशील असलेल्या जिल्हा परिषद गटातील सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांच्या इच्छेवर पाणी पडले आहे. सर्वाधिक लोणी काळभोर गटात प्रभाग रचनेपासून सुरू असलेला ‘राजकीय’ काथ्थाकुटीवर पाणी फेरले गेले आहे.
पुणे जिल्हा परिषदेची ७३ गट आणि १४६ गणांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्याने आता आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत गट आणि गणांमध्ये घट झाल्याने आरक्षण देखील बदलणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील गट आणि गण हे २०११ च्या जनगणनेप्रमाणे सर्वोच्च लोकसंख्येकडून उतरत्या क्रमाने आरक्षित होणार आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी आणि महिलांचे आरक्षण हे सोडतीद्वारे निश्चित केले जाईल. त्यामुळे उरुळी कांचन, लोणी काळभोर (ता. हवेली) गटासह सात गट आरक्षित होण्याची प्रक्रिया निश्चित झाली.

पुणे जिल्हा परिषदेमध्ये अनुसूचित जातीचे सात गट आरक्षित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचा निकष आणि गटांमध्ये अस्तित्वात असलेली लोकसंख्या विचारात घेता, हवेली तालुक्यातील उरुळी कांचन, लोणी काळभोर, बारामती तालुक्यातील गुणवडी, आणि नीरा वागज, दौंड तालुक्यातील गोपाळवाडी आणि इंदापूर तालुक्यातील लासुर्णे आणि वालचंदनगर हे अनुसूचित जातीचे सात गट आरक्षित होणार आहेत. तर आंबेगाव तालुक्यातील शिनोली, जुन्नर तालुक्यातील बारव, डिंगोरे, खेड तालुक्यातील वाडा आणि मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक या पाच गटांचा समावेश अनुसूचित जमातीच्या आरक्षित गटात असू शकतो.
गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत ७५ गट व १५० गण होते. यंदा दोन गट व चार गण कमी झाले आहेत. त्यामुळे आरक्षणात बदल होणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणनुसार आरक्षणाची पुर्नरचना होणार आहे. याबाबत ग्रामविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्याने आता इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष लागले आहे. त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून अंदाज बांधत कार्यकर्त्यांच्या बैठका देखील घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आरक्षणाच्या अंतिम घोषणेची अद्याप प्रतीक्षा असल्याने अनेकांनी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणे टाळले आहे. जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी गावोगावी कार्यकर्त्यांच्या बैठकांना सुरुवात केली आहे. या बैठकीत स्थानिक पातळीवरील मतदार संघटन बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.
नवीन नियमांनुसार पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ गटांपैकी अनुसूचित जातीसाठी ७ आणि अनुसूचित जमातीसाठी ५ गट आरक्षित असतील. अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या ५ गटांपैकी ३ गट महिलांसाठी असतील, तर अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या 7 गटांपैकी 4 गट महिलांसाठी असतील. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २७ टक्के आरक्षण लागू आहे. त्यानुसार, एकूण २० जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असतील, ज्यापैकी १० जागा ओबीसी महिलांसाठी राखीव असतील. उर्वरित ४१ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतील, ज्यापैकी २० जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित केल्या जातील.
पंचायत समिती निवडणुकांसाठी देखील हेच सूत्र लागू असेल. प्रत्येक तालुक्यात स्वतंत्रपणे आरक्षणासाठी जिल्हा परिषद गटांप्रमाणेच सूत्र वापरले जाईल. पंचायत समिती गणांची संख्या लक्षात घेऊन आरक्षणाची टक्केवारी निश्चित केली जाईल. पुणे जिल्ह्यात एका जिल्हा परिषद गटात दोन पंचायत समिती गण अस्तित्वात आले आहेत. या नव्या पद्धतीमुळे पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणासंदर्भात मोठा बदल दिसून येणार आहे.
अनुसूचित जमाती –
खेड- वाडा (लोकसंख्या – २०६५३, ४३.०२ टक्के), जुन्नर- डिंगोरे (लोकसंख्या – २०६५३, ४३.०० टक्के), माळवे टाकवे बुद्रुक (लोकसंख्या १००९२, २१.८८ टक्के )
आंबेगाव-शिणोली (लोकसंख्या ३२४५०,७२.४० टक्के), जुन्नर बारव (लोकसंख्या ३२७२१, ६६.९७ टक्के)
अनुसूचित जाती
हवेली-
लोणी काळभोर (लोकसंख्या ८१२०, १६.३९ टक्के), उरुळी कांचन (लोकसंख्या ७४६५, १६.५६ टक्के),
बारामती-
गुणवडी (लोकसंख्या ९३.२४, १९.७३ टक्के),
दौंड-
गोपाळवाडी (लोकसंख्या ८५६६, १८.०५ टक्के),
बारामती-
नीरा वाघज (लोकसंख्या ८७३४, १६.४२ टक्के),
इंदापूर-
लासुर्णे (लोकसंख्या १०८२१, २२.६१ टक्के), वालचंदनगर (लोकसंख्या १०७७३, २२.३४ टक्के).