अयोध्येहून परतताच मुख्यमंत्री शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश…!

मुंबई : मागील चार दिवसांत राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोध्या दौऱ्यावर गेले होते.
राज्यातील शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री देवदर्शनाला गेले यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र आयोध्या दौऱ्यावरून परतताच मुख्यमंत्री ऍक्शन मोड वर आले असून त्यांनी नुकसानग्रस्त भागांना भेटी दिल्या आहेत. अवकाळी पाऊसामध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे.
एवढेच नाही तर येत्या तीन दिवसांत सर्व पिकांचे पंचनामे करू. तसेच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देऊ असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले आहे. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे देखील ते यावेळी म्हणाले.
आयोध्येत गेल्यानंतर आम्ही प्रभु श्रीरामांकडे बळीराजाचे संकट दूर व्हावे यासाठी साकडे घातले आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. तसेच त्यांनी संबंधित विभागांना तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.