पहलगाम हल्ल्यानंतर मनसेचे नेते, पदाधिकारी जम्मू-काश्मीरला फिरायला जाणार!! पक्षाकडून मोठी घोषणा, नेमकं कारण काय?

मुंबई : काश्मीरच्या पहलगामल येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत आता जम्मू काश्मीरमध्ये अलर्ट जारी केला असून याबाबत कसून तपास सुरू आहे. या घटनेचा जगभरातून निषेध केला जात आहे. असे असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
मनसे नेते मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत एक मोठी घोषणा केली आहे. ज्यांना काश्मीरला जायचं आहे, त्यांनी संपर्क साधावा. काश्मीरला जाणाच्या सहलीची सुरुवात आम्ही आमच्यापासून करतोय. जिथे हल्ला झाला किंवा जे काश्मीरचे पर्यटनाचे ठिकाणं आहेत, तिथे आम्ही जाणार आहोत.
तसेच ते म्हणाले, काश्मीर भारताच अविभाज्य अंग आहे, तिथे जायला आम्ही घाबरत नाही. तर पर्यटकांना आपल्याच भारतात फिरण्यासाठी कुठेही जाण्याची भिती नाही वाटली पाहिजे. हाच संदेश आम्हाला द्यायचा आहे” असं सांगितले. पुढे ते असेही म्हणाले की, काश्मीर पर्यटनावर अवलंबून आहे, तेच बंद पाडण्याचा अतिरेक्यांचा, पाकिस्तानचा डाव आहे.
तो हाणून पाडायचा असेल, तर देश म्हणून एकत्र येऊन काश्मीरमध्ये पर्यटन केलं पाहिजे. हेच दहशतवादाला उत्तर आहे. कुठल्याही परिस्थितीत भारतातील सगळे नागरिक एकत्र येऊ शकतात हा संदेश गेला पाहिजे आणि त्याची सुरूवात आम्ही आमच्यापासून करतोय, असं मनसे नेते देशपांडे म्हणाले.
याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा. १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला.
यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना, या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत. केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्याना कायमच संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. असेही राज ठाकरे म्हणाले.