‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात, केंद्राकडून सुरक्षेचा आढावा…


नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलची महत्त्वाची भूमिका समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू केले आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सुरू झालेल्या या मोहिमेत महाराष्ट्रातील संशयित स्लीपर सेलच्या हालचालींचा आढावा वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येत आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणीतील व्यक्तींना यापूर्वी दहशतवादी कारवायांच्या गुन्ह्यात अटक झाली आहे.

२००६ मध्ये वेरूळ येथे १० एके ४७ रायफल्स, गोळाबारूदसह आरडीएक्स पकडण्यात आले होते. यात बीडच्या जबियोद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याचा सहभाग होता. त्यानेच कसाबला हिंदी भाषा शिकवली होती. त्याला राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने यूएई येथून आणले. तो लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आहे.

दरम्यान, या पथकाने संशयित व्यक्ती, संभाव्य स्लीपर सेल यांच्या माहितीबरोबरच संवेदनशील ठिकाणांना (व्हायटल इन्स्टॉलेशन) भेटी देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केल्याचेही समजते. स्लीपर सेल अ‍ॅक्टिव्हेट झाल्यास नुकसान पोहोचू शकणा-या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

जागतिक वारसा असलेल्या वेरूळ, अजिंठासह जायकवाडी धरण आणि नांदेडमधील गुरुद्वारा, परळी वैजनाथ व घृष्णेश्वर येथे त्यांनी भेटी दिल्याची माहिती आहे. स्थानिक प्रशासनाकडून स्वतंत्रपणे सर्व व्हायटल इन्स्टॉलेशन्सच्या सुरक्षेचा आढावा घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

अशीच कारवाई राज्याच्या इतर भागांतही सुरू असल्याचे समजते. मराठवाड्यात यापूर्वी सिमी व नंतर पीएफआय सक्रिय असल्याचे आढळून आले आहे. काहींचे ‘इसीस’शी संबंध उघडकीस आले आहेत. एनआयए व राज्य दहशतवादविरोधी पथकांनी मराठवाड्यातील अनेक ठिकाणी छापे मारून अनेकांना ताब्यात घेतले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!