नाशिकनंतर डोंबिवलीच्या भोंदू बाबाच पितळ उघड; विधीच्या नावाखाली सोन्या-चांदीची लूट

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात नाशिकच्या अशोक खरात या भोंदू बाबाचं प्रकरण गाजत असतानाच आता डोंबिवली सारख्या गजबजलेल्या शहरात अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका वयोवृद्ध व्यक्तीला
मुलीच्या लग्नातील कथित दोष उतरवण्याच्या बहाण्याने लुबाडल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील दीपक सावंत याने स्वतःला ‘बाबा’ म्हणून भासवत मुलीच्या लग्नातील दोष उतरवण्याच्या खोट्या बहाण्याने एका वयोवृद्ध व्यक्तीकडून सोन्याचे ब्रेसलेट आणि चांदीची लक्ष्मी नाणी घेतली.विधीदरम्यान आरोपीने हे दागिने लाल रंगाच्या रुमालात ठेवण्यास सांगितले आणि चलाखीने रुमालाची अदलाबदल केली.त्यानंतर दुसरा रुमाल हातात देऊन तो तेथून पसार झाला.
वयोवृद्ध व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच काही पीडितांनी विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून दीपक सावंत याला कल्याण परिसरातून अटक केली.आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याची शक्यता असून, पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

दरम्यान, नागरिकांनी अंधश्रद्धेला बळी न पडता कोणत्याही अशा विधी किंवा उपायांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.